प्रस्तावना
श्रीमती लीना मेहेंदळे (निवृत्त IAS)
माजी अतिरिक्त मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य
स्पर्धा, परीक्षा आणि प्लॅनिंग अर्थात् योजनापूर्वक अभ्यास हे तीन पैलू तपासणारे पुस्तक व ते ही सरळ सोप्या मराठमोळ्या धड्यांच्या माध्यमातून. लेखक श्री. मनोहर भोळे यांचा हा उपक्रम स्तुत्य म्हणावा लागेल.
मानव समाज घडला तेंव्हापासून समाजासाठी सुव्यवस्थेची गरज भासू लागली आणि तेंव्हापासूनच अशी सुव्यवस्था टिकवण्यास सक्षम अशा व्यक्तींचीही गरज भासू लागली. त्यातूनच सुशासन, न्याय, न्यायदेवता, नीतिशास्त्र, समाजनीति, राजनीति, दंडविधान, धर्माचरण इत्यादी शब्द उदयाला आले. हे सर्व शब्द समष्टिदर्शक आहेत व त्यांमध्ये समाजाचे अस्तित्व गृहीत धरलेले आहे. एवढेच नव्हे तर ते समाज अस्तित्व - म्हणजेच मानवी समूहांचे सहअस्तित्व टिकून राहिले पाहिजे व त्यासाठी व्यक्तिगत वागणुकीच्या काही सीमारेषा ठरल्या असल्या पाहिजेत ही भावना देखील समाजधारणेसाठी महत्वाची ठरते.
समाज व्यवहारात अगोदर म्हणजेच अगदी सत्ययुगांत अनुभवी व्यक्तींनी घालून दिलेले नियम पालन, त्यानंतर राजेशाही प्रणालीने ते नियम लागू करून घेणे आणि आता जगभर असलेल्या लोकशाही राज्यव्यवस्थेतही तसे नियम पालन होणे ही प्रक्रिया आपल्याला दिसून येते. थोडक्यांत, कोणताही कालखंड पाहिला तरी समाज व्यवस्थेसाठी नियम व नियम पालनासाठी यंत्रणा यांची गरज नेहमीच राहिलेली आहे.
वर्तमान भारताबद्दल बोलूया. आपला भारत हा अतिविशाल आणि जागतिक लोकसंख्येतील दुसरा देश आहे. इथे एक प्रशासनाची व्यवस्था आहे. त्यामध्ये नवनवीन भरती होत असते. ती परीक्षांच्या माध्यमातून होते आणि स्पर्धा हा शब्द का? तर परीक्षार्थींची संख्या ही अवाढव्य असल्याने त्यातून थोडेसेच उमेदवार निवडतांना अधिक योग्य उमेदवार मिळावेत यासाठी या परीक्षांचा स्तरही वाढवावा लागतो. अशी परीक्षा उत्तीर्ण व्हायची असेल तर तयारीही जोरदार असायला हवी. त्याचे प्लॅनिंग कसे करावे? हे समजावून देण्यासाठी हे पुस्तक.
आधीच हे स्पष्ट करते की पुस्तक वरकरणी जरी IAS/UPSC या स्पर्धा परीक्षांसाठी आहे असे म्हटले असले तरी भारतातील अनेकविध कर्मचारी भरतीसाठी स्पर्धापरीक्षा घेतल्या जातात व या पुस्तकातील कित्येक सूत्र, कित्येक पद्धती सर्वच परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे यातील बराचसा भाग इतरांसाठी उपयोगी आहे - म्हणजे MPSC, बँक, आर्मड् फोर्सेस इत्यादी सर्व तर्हेच्या परीक्षांसाठी. एवंच या पुस्तकातील अध्यायांचे दोन भाग पडू शकतील - सरसकट सर्व परीक्षांसाठी आणि केवळ UPSC परीक्षांसाठी.
पुस्तकाचे प्लॅनर हे शीर्षकच सांगून जाते की, परीक्षार्थींनी योजनापूर्वक परीक्षांची तयारी व अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी या परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जातात? हे माहित पाहिजे. अभ्यासक्रम काय असतो? त्याची तयारी कशी करावी? परीक्षा लिहिताना आधी-नंतर काय काळजी घ्यावी, इत्यादी अनेक प्रश्नांची उकल विद्यार्थ्यांना असली पाहिजे. त्यादृष्टीने लिहिलेल्या 15 अध्यायांमध्ये विभागणी पाहिल्यास पहिला व तिसरा अध्याय परीक्षेची संरचना व अभ्यासक्रम समजण्यासाठी, तेरावा-चौदावा अध्याय निवडून आलेल्या उमेदवारांसाठी, बारावा अध्याय सर्वांत शेवटच्या मुलाखत या टप्प्यासाठी असल्याने मी त्यांची विवंचना करीत नाहीये. शेवटचा पंधरावा अध्याय एकूण अभ्यासक्रमाबाबत आहे.
मात्र मराठीतून पेपर लिहिणे का सोपे किंवा महत्त्वाचे आणि ते लिहिण्याच्या - विशेषत: दुर्वेध टर्मिनॉलॉजी हाताळण्याच्या सोप्या ट्रिक्स काय आहेत. मुलाखतीसाठी भाषा कोणती निवडावी? मराठी का हिंदी का इंग्रजी - त्याचे निकष काय असावेत याची चर्चा व्हायला हवी. उदा. एखादा मराठी टर्मिनॉलॉजीचा शब्द फारसा माहित नाही असं वाटत असेल तर उत्तर लिहितांना त्या शब्दानंतर आवर्जून त्याचा इंग्लिश प्रतिशब्द लिहावा.
पुस्तकात श्री. मनोहर भोळे यांनी समाविष्ट केलेली काही माहिती फारच उपयोगी असून त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहे. विशेषत: पूर्व परीक्षेच्या पेपरमधील विषयांचे संख्यात्मक विश्लेषण. यामध्ये परीक्षांर्थींनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, हेच विश्लेषण जसेच्या तसे 3 ते 5 वर्षांनी चालणार नसेल, इथे दाखविलेला फक्त नमूना आहे व ज्या त्या वर्षासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचा स्वत:चा विश्लेषणाचा तक्ता बनविण्याची गरज असेल.
अभ्यासासाठी कोणती पुस्तके वापरावीत? याचे छान विश्लेषण केले आहे. नविन विषय असेल तर सर्वप्रथम त्याची तोंडओळख होणे गरजेचे असते. त्यासाठी NCERT ची पुस्तके व एकदा ती झाल्यानंतर त्या विषयाचे स्वत:ला नीट आकलन होण्यासाठी त्या विषयावरील दर्जेदार पुस्तके वाचली पाहिजेत. याचसोबत पुस्तक कसे वाचावे? नोट्स कशा काढाव्यात? याची उदाहरणे दिलेली आहेत.
लेखनाचा सराव करणे महत्त्वाचे. तसेच विचारलेल्या प्रश्नाचा रोख ओळखून त्या मुद्यावरहूकूम उत्तर लिहावे. उजळणी कशी करावी? त्याचप्रमाणे सराव चाचणीप्रश्न सोडवून आपली तयारीदेखील जोखली पाहिजे. निबंधाची तयारी व वैकल्पिक विषयांची तयारी याबाबींचा ऊहापोह केलेला आहे.
सध्या UPSC परीक्षेमध्ये CSAT ला फार महत्त्व आहे. कारण याचे मार्क्स जरी मोजले जात नसतील तरी यात पास मार्क्स न पडल्यास अनुत्तीर्ण मानले जाते. त्यामुळे याची विस्ताराने व विभागवार चर्चा केली आहे. ही चर्चा विद्यार्थ्यांच्या फार उपयोगाची आहे.
स्व:व्यवस्थापन कसे करावे? इंग्रजी कशी सुधारावी? याचबरोबर लेखकाने विद्यार्थ्यांचे प्रकार आणि परीक्षा नजीक असलेल्या काळात काय करावे? याचे छान विवेचन केलेले आहे.
या पुस्तकाला मी सुयश चिंतीते आणि लवकरच विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल अशी आशा करते. शिवाय खालील काही टीप्सही सूचवू इच्छिते....
-
ग्रुपने अभ्यास केल्यास (किमान दोन जणांत) जास्त फायदा होतो.
-
यश हुलकावणी देत राहिल्यास आपण कधी थांबणार आहोत व पुढे काय करणार आहोत याची चर्चा परिवारात आधीच करून ठेवावी.
-
वेळापत्रकात दिवसाचे फक्त आठ तास अभ्यास होणार असतो, हे ध्यानात घ्यावे.
-
निबंधलेखन पहिल्या दिवसापासून व आठवड्याला एक याप्रकारे करावे. निबंध शक्यतो एखाद्या उत्तम शिक्षकाकडून तपासून घ्यावा.
-
या अभ्यासासाठी आपला एखादा Mentor शोधून त्यांचे मार्गदर्शन घेत रहावे.
-
आठवड्यातून एक सुट्टीचा दिवस ठेवावा. तसेच महिन्यातून एखादे अवांतर म्हणजे कथा, कादंबरी, तंत्रज्ञान, फिलॉसॉफी यांसारख्या पुस्तकाचे वाचन करणे गरजेचे असते.
-
एका तक्त्यात जुलै ते मार्च या महिन्यात आपण एकूण दहा लेखी विषयांपैकी कोणाचा किती अभ्यास करणार ते लिहावे. एप्रिल/मे/जूनचा साप्ताहिक तक्ता करून त्यात फक्त प्रिलिमच्या विषयांचे नियोजन विस्ताराने करावे. त्यापुढील जुलै ते ऑक्टोबर मुख्य परीक्षेसाठी सप्ताहवार तक्ता तयार करावा. त्या त्या नियोजनाप्रमाणे अभ्यास करावा. पण नियोजनात ठरलेला सगळाच अभ्यास दररोज पूर्ण होत नसेल तर निराश होऊ नये. वाटल्यास आपल्या क्षमतेप्रमाणे तक्ता नव्याने आखावा.
-
अभ्यासातील मुख्य Terminology, सूत्र, Quotable वाक्य इत्यादी खूप मोठ्या अक्षरात कागदावर लिहून ते कागद दारे/भिंती इत्यादींवर चिकटवून ठेवावे - तर येता जाता त्यांचे सहजगत्या वाचन व मनन होत राहते.
-
आपण काय अभ्यास केला याचा रोजचा अहवाल कोणाला तरी द्यावा - ग्रुपमधील मित्राला, परिवारातील सदस्याला, Mentor ला किंवा शेवटचा पर्याय म्हणजे स्वत:ला.
-
अवांतर वाचन केलेल्या विषयातील काय गोष्टी आपल्या अभ्यासाला नवी दिशा देतात ते तपासावे. अशा Connectivity चा खूप फायदा होतो.
असो.
जाता जाता एक महत्त्वाचे.
आपण या नोकरीत का येत आहोत? हा विचारही महत्त्वाचा आहे. तोच खर्या अर्थाने आपल्याला प्रेरणा देत असतो.
श्री. मनोहर भोळे यांचे पुन:श्च अभिनंदन. हे पुस्तक वाचून वाचकांचे UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रयत्न योग्य वळणाने जातील व त्यांना यशलाभ देतील. ही सर्व वाचकांना शुभेच्छा.
श्रीमती लीना मेहेंदळे
(निवृत्त IAS)
leena.mehendale@gmail.com